श्रावण महिमा
श्रावणाच्या सरी |उन्हात नाहती |
सुगंधे वाहती| रान फुले ||
नदीलाही झाली |श्रावणाची बाधा|
कृष्णा संगे राधा| नादावली ||
श्रावणाचा मास| इंद्रधनु दावी |
आभाळाच्या लावी|गाली तीट||
धरणीस मिळे| नभाचे हे दान |
तरारले रान|श्रावणात ||
घेऊनिया येई|सण खांद्यावरी |
जणू वारकरी | विठ्ठलाचा ||
खेडोपाडी चाले|ग्रंथांचे पुजन|
अध्यात्म सृजन|पारायणे ||
माहेर वाशिणी|माहेराला येती |
उजळती वाती |दुर्मुखल्या||
म्हणे हा केशव|सर्वा मिळो सुख|
आनंदावे मुख|प्राणिमात्रा ||
कवी श्री. केशव शेलवले सर
शहापूर
No comments:
Post a Comment